अशाच एका संध्याकाळी पाऊस होता मुसळधार
अनोळखी ही नजर माझी शोधात होती खरा आधार
तोच म्हणे पाऊस अचानक अनोळखी मज म्हणशी का ग?
माझ्यापरी अनेक रूपे तुझाच जणू मी अविभाज्य भाग
मी ही राणी पोटामध्ये लखलखणारी वीज ठेवतो
तरीही खोट्या आनंदाने ढगांमधुनी गडगडतो
तू ही अशीच ठेवतेस ना ग हृदयामध्ये दाबून कळ?
हास्य घेउनी ओठांवरती मनामधले झाकतेस वळ?
मी ही बघ ना जमिनीला भेटायाला वरून येतो
जाताना मी होऊन रिता तिला प्रफुल्लीत करून जातो
तुझीही ओंजळ संपून जाते तुझ्याच सार्या लोकांसाठी
तुझी स्वप्ने,तुझ्या अपेक्षा तुझ्या मनाची होते माती
वेदनेचे रूप माझे ध्वनी रिमझिम, रिपरिप, गडगड
तुझ्या मनीचे भाव लपवी तुझ्या मुखीची अखंड बडबड
माझ्या सार्या दु:खाचे मी सुंदर इंद्रधनू बनवतो
तुझ्या सार्या अश्रूंचा एक एक शब्द बनत जातो
रंग रूप ही एकमजला त्याचे म्हणणे मी ही केला जरा विचार
अनोळखी हा कसा ग मजला हाच तर आहे खरा आधार
तसा आणखी पाऊस हा नजरेच्या ही परिचयाचा
आकाशातून कोसळताना कधी पापण्या ओलावायाचा
जेंव्हा जेंव्हा येतो पाऊस आता तेंव्हा हुरूप येतो
दर्पणाची ही नसे जरुरत मलाच माझे रूप दावतो
मी ही आता न चुकता पावसाची वाट पाहते
आनंदाने मनापासुनी त्याला माझी साथ देते
पावसाला नवी सखी अन मला नवासा मित्र मिळाला
(छायाचित्र अंतरजालावरुन साभार)
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.
No comments:
Post a Comment