Saturday 31 May 2014

"सुख"



'इतका कसा रे निष्ठुर तू?'
काल न राहुन देवाला विचारलं
'जरा तरी सुख द्यायचंस की पदरात'
चांगलंच त्याला सुनावलं..

हळूच हसला तो
म्हणाला हिशोब देतोच आज
सुखाचं उदाहरण मी सांगतो,
तू दु:खाचे पाढे वाच..

मी यादीच ठेवली त्याच्यापुढे,
म्हणलं 'आता तू सुख दाखव बरं
दु:खापेक्षा ते दिसलं ना मोठं
तरंच मी तुला मानेन खरं'

'आता का रे इतका शांत?'
मी चिडुन त्याला विचारलं
त्याने हळूवार पाहिलं माझ्याकडे
अन् 'तुझ्याकडे' बोट दाखवलं..

हिशोब दिलाय त्याने,
या वादात त्याची बाजु वरचढ आहे.
कारण खरचं रे माझ्या आयुष्यात
सुखाचं पारडं 'जड' आहे..
स्मित




(कोलाजातील सर्व छायाचित्रे अंतरजालावरून साभार)

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

Wednesday 9 January 2013

"त्या"ची कविता

एक लाडकासा मित्र माझा
माझ्यावर कविता कर म्हणायचा
नाही रे जमत म्हणल्यावर
चिडव चिडव चिडवायचा

इतकं का ते सोप्प आहे

तुच सांग राजा आता
मुर्तीमंत काव्यावरती
कशी रचावी मी कविता?

तुझी मैत्री, तुझी साथ

काय काय इथे मांडू ?
तुझं असणंच लाख मोलाचं
त्याला चार शब्दात कसं बांधू ?

आणि करावाचं म्हणला छोटासा प्रयत्न

तर उघडावी लागेल आठवांची कुपी
मग कदाचित तुझ्यावरली
कविता होईल सहज सोप्पी

पण मी म्हणते हवीच कशाला

इतकी सारी उठाठेव
तुझं असणं माझ्यासाठी,
माझ्यापुरतंच राखुन ठेव

आणि समजा तुझ्या वर्णना

ओवलेच मी शब्द जर
न जाणो तुझ्या अचानक
कविताच प्रेमात पडली तर????? डोळा मारा






(छायाचित्र अंतरजालावरुन साभार)

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.