Monday 26 March 2012

"आठवणींचे मोरपीस"

सारे काही तसेच आहे
तेच कॉलेज तोच कट्टा 

तोच तू अन तीच मी परी

भिन्न जाहल्या साऱ्या वाटा

हाच रस्ता हीच वाट 

इथेच पडली आपली गाठ

हाच पार अन हीच टपरी

तसाच आहे यांचा थाट


तुझीच मी अन तूच माझा

तुझाच मजला लागे छंद

हेच सारे जीवलग साक्षी 
जुळले जेंव्हा आपले बंध


परी तुटले बंध जसे

एकेक मोती हरवत गेला

भेट देता त्या काळाला

आठवणींचा गो  मिळाला


रिती करते समोर ओंळ 

तूही मोती जोडून बघ

गोफ गुंफुनी क्षणापुरता 

आठवणी काही आठवून बघ 


पूर्वी सजणा माझ्यासवे    

ही बाग तुझ्यावर रुसायची

तू मनवता मला सख्या मग

स्वतःही खुदकन हसायची


नाव कोरता तुझ्यासवे मी

फळा ही हा मोहरायचा
तू घेता मिठीत मजला 

परिसर सारा शहरायचा


आपल्या Common बाकावरती 

कोरलेले ते असंख्य बाण 

नाव लिहिले ज्या झाडावर

त्यास आठवते आपली आण


इथले वारे आज ही राजा

पूर्वी सारखे धुंद वाहतात 

जवळ येऊन कानामध्ये 

तुझेच प्रेमगीत गातात


भिंती निर्जीव उत्सुकतेने

माझ्याकडे पाहत होत्या

"का ग राणी आज एकटी?"

आतुरतेने विचारात होत्या


स्मित करुनी त्यांस म्हणे मी

भूतकाळच्या त्या आठवणी

अनोळखी मज असे आता तो

ही खरी वर्तमान कहाणी 


बोल ऐकता हे सख्या

सगळे काही सुन्न झाले

प्रश्न विचारू लागले सारे

वातावरणच भिन्न झाले


त्या बागेनी केला प्रश्न

जवळी नव्हते त्याचे उत्तर

"नाजूक नाते फुलांपरी त्या

अन कसे उडाले त्यातून अत्तर?"


अन लागला मला विचारू

तोच फळा अन तोच परिसर

"कसा पडला तुम्हास सांग

त्या नावाचा,मिठीचा विसर?"


"हृद्य आमचे तुम्ही कोरले "

बाक आणि झाड वदले

ती आण अन ते बाण

कसे इतक्या सहज विरले?


झुळझुळणारा चंचल वारा

क्षणापुरता स्तब्ध झाला

हरवलेली प्रीत पाहुनी

तोच असा निशब्द झाला


त्याच पावली परत  फिरले
गोफ सारे पुन्हा तोडले

लपविले मी सारे मोती

वर्तमानी पुन्हा परतले


त्या वाटेला ऐक साजणा

नकोस फिरकू तू रे कधी

घाव घालती हृदयावरती

मन ससा अन प्रश्न पारधी


माझ्यापरी राजा तुला

असाह्य होतील प्रश्न सारे

मिटले पुस्तक आठवणींचे

तसेच असु दे मधुर प्यारे


तरीही गेलास तर करशील काय?

त्यांना सांगशील कुठली कहाणी?

स्वप्नामध्येच राज्य आपले

स्वप्नामध्येच मी तुझी राणी


गेलास तर मात्र एवढ कर

त्या सगळ्यांना सांग स्पष्ट

राजा, राणी, प्रेम, संसार

एवढीच नसते नेहमी गोष्ट


कितीही असले प्रेम तरीही

अपूर्ण राहतात काही नाती

कारण आपण शुल्लक पुतळे

तो "वरचा" बांधतो साऱ्या गाठी


सांग त्यांना "त्या"च्या साठी

माळ मोडली स्वहाताने

आठवणींची फुलपाखरे

मिटून टाकली संगनमताने


त्या आठवणींचे झाले मोरपीस 

हृदयामध्ये जपले आहे

आणि देवापेक्षा ही पवित्र आमचे 

प्रेम मनातच पूजले आहे 









(छायाचित्र अंतरजालावरुन साभार)
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

No comments:

Post a Comment