Saturday 31 March 2012

"उशीर"

आठवतात का सख्या तुला 
कॉलेज चे ते दिवस?
बेधुंद,मनोहर,प्रांजळ तरी
तुझ्याविना नीरस

कित्येक तास अन घटका तेंव्हा
वाट तुझी पहायच्या 
तुझ्या एका हास्यासाठी 
मनोमनी झुरायाच्या

आल्या आल्या नजर माझी 
शोध तुझा घ्यायची
तू आलास की तुझी पावले
दुसरीकडेच वळायची

कित्येकदा तर बोलता बोलता
शांत मी व्हायचे 
जागेपणी उघड्या डोळ्यांनी
स्वप्ने तुझी पाहायचे

तुला मात्र डोळ्यामध्ये
कधी भावना दिसल्या नाहीत
माझ्या मनी उमललेल्या 
कळ्या कधी गवसल्या नाहीत

दिवस येता शेवटचा तो
तू आलास माझ्या जवळी
शांत तू ही अन शांत मी ही
पण हृदयामध्ये हुरहुरी 

"जीव जडला माझा सखे
हृद्यातुनी जळतो आहे
रूप साठवुनी नजरे मध्ये 
होकार साठी झुरतो आहे"

बोल ऐकता तुझे सख्या ते
मनी उमटले इंद्रधनु
शब्द तुझे रे पाऊसधारा
अन् ह्द्य माझे मयुर जणु

"अन्नपाणी मज गोड न लागे
झोप ही रात्रीची उडली
या दुखण्याला एकच औषध 
तूच माझी आशा एकली "

"निरोप दे हा तुझ्या सखीला
आयुष्यभर मानीन ऋण"
ऐकून तुझे हे शब्द साजणा 
जीवन गेले अंधारून

खरच सांगते राजा तेंव्हा
मनाचा माझ्या खेळ झाला
तरीही दिली साथ तुला मी
अन तुझा प्रेमाशी मेळ झाला

थोडक्यात चुकली वेळ म्हणायची
तू दुसरीसाठीच अधीर झाला
असेच प्रेम ही मी केलेले
फ़क़्त थोडा "उशीर" झाला 












(छायाचित्र अंतरजालावरुन साभार)
-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.

2 comments: