Sunday 13 May 2012

एक सर इवलीशी


 एक सर इवलीशी
 दावी रुपे किती किती
 धागा गुंफ़ते मनाचा
 त्यात आठवांचे मोती

 एक सर इवलीशी
 गुज आईचे सांगते
 मातीतच मिसळते
 गंध मातीलाच देते

 एक सर इवलीशी
 रूप "बा"चे ती दावते
 प्रेम बरसवे सारे
 स्वत: होऊनच रिते

 एक सर इवलीशी
 अशी मला बिलगते
 जशी खट्याळ बहीण
 माझ्या पदरी लपते

 एक सर इवलीशी
 सखीपरीस भासते
 स्पर्शानेच शब्दाविन
 सांगी अनेक गुपिते

 एक सर इवलीशी
 "त्या"च्या सारखी लबाड
 येता आनंद पाझरे
 जाता अश्रुंचे घबाड

 एक सर इवलीशी
 मेघ भरुन वाहते
 येता सय माहेराची
 तीच काळीज जाळते















  (छायाचित्र अंतरजालावरुन साभार) 
- प्रियांका विकास उज्ज्वला फ़डणीस.

6 comments:

  1. >>
    एक सर इवलीशी
    मेघ भरुन वाहते
    येता सय माहेराची
    तीच काळीज जाळते

    हा शेवट हलवुन गेला बघ.....:(

    ReplyDelete
  2. धन्स गं :)
    तुझ्या अनुभवातलं असेल ना ते कडवं?

    ReplyDelete
  3. Khup Chhan...:-)
    HrudaySparshi...!!

    ReplyDelete
  4. एक सर इवलीशी
    "त्या"च्या सारखी लबाड
    येता आनंद पाझरे
    जाता अश्रुंचे घबाड

    aavaDala!
    :-)

    ReplyDelete